(रत्नागिरी /प्रतिनिधी)
आईच्या ब्रेन ट्यूमरवरील शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने मानसिक तणावात असलेल्या २४ वर्षीय तरुणाने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गणपती विसर्जनानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाने चुलत भावाला ‘हा माझा शेवटचा मेसेज आहे’ असा व्हॉट्सअॅप संदेश पाठविल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिस नोंदीनुसार, रंजित दत्ताराम तांडेल (वय २४, रा. धाकटी जांभारी, ता. जि. रत्नागिरी) हा आईच्या ब्रेन ट्यूमरवरील शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती बरी नसल्याने तणावात होता. त्यातून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे नोंदीत नमूद करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर ‘चुलत भावाला सोडून येतो’ असे सांगून रंजित घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने चुलत भाऊ केतन तांडेल याला व्हॉट्सअॅपवर ‘हा माझा शेवटचा मेसेज आहे’ असा संदेश पाठविला. हा संदेश नातेवाईकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सैतवडे पेठ मोहल्ला येथील स्मशानभूमीजवळील आंब्याच्या झाडाला रंजित लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तो बेशुद्ध असल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद-खंडाळा येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरीकडे नेत असताना जाकादेवी येथे त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी येथे रात्री ९.५२ वाजता दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३६/२०२६ म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास जयगड पोलिसांकडून सुरू आहे.


