(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील एस टी महामंडळाचे वाहतुक नियंत्रक श्री. राजू चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीत अतिशय उत्तम सेवा बजावल्याबद्दल खंडाळा पंचक्रोशी मित्रमंडळाच्यावतीने त्यांचा नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे औचित्य साधून करण्यात आला.
श्री.चव्हाण हे मे २०२५ मध्ये सेवानिवृत्त झाले. परंतु सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी आपल्या कारकिर्दीत अतिउत्तम सेवा दिली . त्यामध्ये प्रशासन व प्रवासी यांचा उत्तम समतोल साधत त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली. आपल्या कामगिरीमुळे खंडाळा पंचक्रोशीत सर्व नागरिकांचे मन त्यांनी जिंकले. मुळातच त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ असल्याने त्यांनी कमी वेळेत सर्वांना आपलसं करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी सर्व बाबतीत तत्पर सेवा दिली.
या तत्पर सेवेमध्ये मुलांचे पास असोत किंवा गावागावात एसटी सेवा सुरळीत कशी राहील तसेच तिकीट विक्री असो किंवा अन्य कोणतेही काम त्यांनी मनापासून केले. अशा कार्यतत्पर एसटी कर्मचाऱ्याचा खंडाळा पंचक्रोशी मित्रमंडळ यांच्या वतीने नुकताच खंडाळा येथे यथोचित सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.