(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात विविध ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. लांजा एसटी स्थानकात पहाटेच्या वेळी चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या आढळलेल्या व्यक्तीपासून ते मालकीची कागदपत्रे नसलेल्या दुचाकीस्वारापर्यंत, तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
लांजा एसटी स्थानक परिसरात ७ ऑक्टोबर रोजी पहाटे १.४० वाजण्याच्या सुमारास प्रशांत नामदेव सुतार (वय ३२, रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली; सध्या जाकादेवी, रत्नागिरी) हा चोरी करण्याच्या उद्देशाने सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत संशयास्पद परिस्थितीत आढळल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सहा. पोलीस निरीक्षक देवकन्या विठ्ठल मैदाड यांच्या फिर्यादीवरून सुतार याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२२(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाली बाजारपेठेत मुंबई-गोवा महामार्गावर वाहन उभे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी टाटा कॅरी चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास रोहित गंगाराम कांबळे (वय ३६, रा. पाली बौद्धवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा कॅरी (एमएच ०९ केए ४८३३) रस्त्यावर अशा पद्धतीने उभी करून ठेवलेली स्थितीत आढळून आला की, मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा आणि धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पाली दूरक्षेत्रातील पोहेकॉ/१४२ सर्याजी राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कांबळे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात रिक्षा अशा पद्धतीने उभी केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र बाबाजी सावंत (वय ५१, व्यवसाय—रिक्षाचालक) यांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ ए क्यू ७८५०) रहाटाघर ते मारुती मंदिर मार्गावरील इंडियन इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर उभी केली होती. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांसह पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोहेकॉ/४२८ शरद बाबल्या कांबळे यांच्या फिर्यादीवरून सावंत यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंभार्ली घाटमाथ्यावरील महामार्गावर १६ टायरी टाटा ट्रेलर धोकादायक पद्धतीने चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात अलोरे-शिरगाव पोलिसांनी कारवाई केली. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली चेकपोस्टच्या पुढे चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या वळणावर ट्रेलर क्रमांक एनएल ०१ एएच ४४४४ चालक गोरख पोपट नवत्रे (वय ३२, रा. रड्डे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हा वाहन चालवताना आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वाहन सार्वजनिक रस्त्यावरून मानवी जीवितास धोका किंवा दुखापत निर्माण होण्याची शक्यता असतानाही बेदरकारपणे व हयगयीने चालवण्यात आले. तसेच पुढून व मागून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोहवा/२१३ दिनेश आनंदा कोटकर यांच्या फिर्यादीवरून नवत्रे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २२३, २८१ आणि २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील या विविध कारवायांमधून सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली, वाहनांच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
कागदपत्रे नसलेली पल्सर
रत्नागिरी शहरातील फगरवठार परिसरात पोलीस लाइनजवळ पुढील नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणाकडे वाहनाच्या मालकीबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अमोल सुरेश जगताप (वय २४, व्यवसाय—भंगार खरेदी-विक्री/फिरस्ते, रा. स्टेट बँक कॉलनी, साळवी स्टॉप, रत्नागिरी) हा पल्सरवरून जाताना आढळला. चौकशीदरम्यान वाहनाच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याचे तसेच त्याने समाधानकारक माहिती दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामुळे सदर मोटारसायकल त्याने कोठून तरी चोरी करून अथवा अन्य प्रकारे फसवणूक करून मिळवली असावी, असा पोलिसांचा संशय असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर १५० सीसी मोटारसायकल (एमएच ०८ यू ९४६३) जप्त करण्यात आली. पोहेकॉ/७५४ भालचंद्र दिलीप मयेकर यांच्या फिर्यादीवरून जगताप याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


