(रत्नागिरी /प्रतिनिधी)
निळाशार समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि निसर्गरम्य किनारे यामुळे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे कायम आकर्षण राहिला आहे. मात्र, समुद्राच्या खोलीचा अंदाज न येणे, भरती-ओहोटीच्या लाटांचा वेग आणि पाण्याचे प्रवाह यामुळे पर्यटनाचा आनंद क्षणात दुर्घटनेत बदलल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत समुद्रातील दुर्घटनांमध्ये तब्बल १४३ नागरिक व पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता बचावकार्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली आहे.
समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगाने पोहोचून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पाच अत्याधुनिक ‘लाइफ सेव्हिंग रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या यंत्रणांचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज अधिकृतपणे पोलीस दलाकडे हस्तांतरण करण्यात आले. ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ही उच्च तंत्रज्ञानयुक्त उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पारंपरिक बचाव पथकांना समुद्राच्या लाटांशी थेट झुंज द्यावी लागू नये आणि संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत कमीत कमी वेळेत मदत पोहोचावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
समुद्र खवळलेला असताना किंवा लाटांचा वेग वाढलेला असताना बचावकार्य करणे हे मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत हे रोबोटिक वॉटर क्राफ्ट संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या दिशेने वेगाने पाठविता येणार आहेत. त्यामुळे बचाव पथकाला सुरक्षित अंतरावरून मदत करता येण्याबरोबरच बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत तातडीने जीवनरक्षक साधन पोहोचविणे शक्य होणार आहे. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. पर्यटकांची विशेष वर्दळ असणाऱ्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गणपतीपुळे, दापोली तालुक्यातील मुरुड-लाडघर पट्टा, गुहागर तसेच आरे-वारे या किनाऱ्यांवर या रोबोटिक वॉटर क्राफ्टची तैनाती करण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न केवळ पर्यटनाशी संबंधित नसून तो थेट मानवी जीविताशी निगडित आहे. गेल्या पाच वर्षांतील १४३ मृत्यूंची आकडेवारी या धोक्याची तीव्रता अधोरेखित करते. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर बचाव करण्याबरोबरच ‘वेळ म्हणजेच जीवन’ या सूत्रानुसार बचावयंत्रणा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या नव्या यंत्रणेमुळे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक बचाव पथकांच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षाव्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाल्याने आपत्कालीन प्रतिसादाचा कालावधी कमी होऊन संभाव्य जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे.
या हस्तांतरण सोहळ्यास आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम यांच्यासह पोलीस आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समुद्राची लाट थांबवता येणार नाही; मात्र त्या लाटेत सापडलेल्या जीवाला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी आता रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तंत्रज्ञान सज्ज झाले आहे. त्यामुळे या रोबोटिक बचावयंत्रणेकडे केवळ आधुनिक उपकरणे म्हणून नव्हे, तर संकटाच्या क्षणी एखाद्याचा जीव वाचविणारे संभाव्य ‘जीवनदूत’ म्हणून पाहिले जात आहे.


