(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकण कन्या एक्सप्रेसमधून अवैधरीत्या मद्य वाहतूक केल्याप्रकरणी एका एसी कोच अटेंडंटला आरपीएफने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रंगेहाथ पकडले. या कारवाईत तब्बल ३५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची नियमित तपासणी सुरू असताना रत्नागिरी स्थानकावर आरपीएफ आणि सी अँड आय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संशयावरून संबंधित अटेंडंटची झडती घेतली. या तपासणीत त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या मद्याचा साठा आढळून आला. तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे, रेल्वे सेवेशी संबंधित कर्मचाऱ्याचाच अशा प्रकारच्या गैरकृत्यात सहभाग उघडकीस आल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे प्रवास शिस्तबद्ध राहावा यासाठी अशा प्रकारच्या कारवायांना अधिक गती देण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक टाळावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे. संबंधित अटेंडंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

