(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील पानवल येथे अतिवेगामुळे घडलेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर दुचाकी जोरात आदळल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव जयसूर्या शांताराम मांडवकर (वय २८, रा. कापडगाव, रत्नागिरी) असे आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता ते आपल्या युनिकॉर्न (एमएच ०८ ए.वाय. २००७) दुचाकीवरून रत्नागिरीकडून हातखंबाच्या दिशेने जात होते. पानवल येथील मळूस्टे यांच्या बागेसमोर आल्यानंतर त्यांनी वाहनाचा वेग नियंत्रित न ठेवल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जोरात आदळली. या धडकेत जयसूर्या मांडवकर गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा ४ मे रोजी रात्री नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

