(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील प्रशांत नगर–स्वरूपानंद नगर परिसरात ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून शेजारी उभी असलेली दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने जवळील बंगल्याला आणि परिसरातील अन्य मालमत्तेला होणारा मोठा धोका टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत नगर येथील रहिवासी सूरज जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेल्या मारुती सुझुकी कारमधून मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारला विळखा घातला. आगीच्या तीव्रतेमुळे शेजारी उभी असलेली दुचाकीही पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मध्यरात्रीच्या शांततेत आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्राचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे आग बंगल्यापर्यंत किंवा शेजारील घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आली.
या आगीत कारचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीही जळून नुकसानग्रस्त झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट अथवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक केले असून त्यांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली आहे.

