[ विशेष/ प्रतिनिधी ]
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम घेतलेल्या रवि इफ्रा या ठेकेदार कंपनीने आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. हातखंबा तिठा परिसरात गाड्यांची कायम वर्दळ पाहायला मिळत असते. या भागात सध्या मुंबई- गोवा महामार्गासह मिऱ्या – नागपूर मार्गाचे काम येऊन ठेपले आहे. येथील रस्त्यावरील खड्ड्यामधून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदार कंपनीचे चांगलेच फावत आहे.
मिऱ्यापासून हातखंब्यापर्यंत काही भागात तुकड्यात काँक्रिटीकरणाच्या मार्गिका तयार केल्या आहे. त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. उर्वरित भागात वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. हातखंबा तिठा येथील रस्ते खोदून ठेवल्याने या ठिकाणी आल्यावर आपला मार्ग कोणता हाच प्रश्न निर्माण होतो, बाहेरील पर्यटकांना मॅपमधून ही मार्ग कुठून कुठे जातोय हे समजत नाही. स्थानिक नागरिक किंवा रिक्षाचालकांना विचारण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्यातून मार्गावरून जाताना धूळ, खड्ड्यांमधील दणके वाहनचालकांना प्रवाशांना नित्यांचे झाले आहे.
दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कामांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. तयार करण्यात आलेल्या मोठमोठ्या मातीच्या डोंगरांमुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र गेल्या पावसाळ्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणे जरुरीचे आहे. लोकांना त्यांच्या घराच्या दिशेने जाणारे मार्ग देखील ठेकेदार कंपनीकडून व्यवस्थित पद्धतीने बनवून देण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर सध्या काँक्रीटकरणाच्या मार्गीकेवरून मोठी वाहने वेगाने हाकली जात आहेत हे एखाद्या अपघाताला निमंत्रणच आहे. उर्वरित भागात खड्ड्यांनी ग्रासलेल्या रस्त्यांवर रोज दुचाकीस्वारांचा अपघात घडत आहे. विशेषतः दुचाकीस्वरांचा या रस्त्यावरून जीव टांगणीला लागत आहे. तर प्रवास करताना मोठ्या वाहनांमागून प्रचंड धुळीचे लोट उसळत आहे. रवि इन्फ्रा या ठेकेदार कंपनीमार्फत सोयीनुसार पाणी मारले जात असून या उसळणाऱ्या धुळीने रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या नागरीकांना निरनिराळ्या आजारांनी ग्रासले आहे.
ठेकेदार कंपनीला सोयरसुतक नाही…
दरम्यान ठिकठिकाणी अर्धवट कामामुळे वाहतुकीला शिस्त नाही. हातखंबा तिठ्यात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. मार्गावरील अर्धवट कामामुळे खडीवरून घसरून तसेच पडलेल्या खड्ड्यात वाहने घसरून अनेकांना गंभीर दुखापतीसह किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना तसेच काम करणाऱ्या रवि इंफ्रा या ठेकेदार कंपनीला याचे सोयरसुतक नाही. अशा ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभारावर स्थानिक नागरीकांसह वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.