(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विकासाच्या गप्पा आणि कोट्यवधींच्या महामार्ग प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षात मात्र वाहनचालकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील जे. के. फाईल परिसरापासून खेडशीपर्यंत मिऱ्या–नागपूर महामार्गावर उनाड गुरांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
या महामार्गाच्या मध्यभागीच गुरे निर्धास्तपणे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना भरधाव वेगातील वाहतूक थांबवून त्यांच्या भोवती वळसा घालण्याची वेळ येत आहे. अनेकदा ही जनावरे अचानक रस्त्यावर धावत आल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी चालकांचाही तोल जात असून, अपघाताच्या घटना घडत आहेत. उनाड गुरांसोबतच भटक्या कुत्र्यांचाही वाढता वावर धोक्यात आणखी भर घालत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा महामार्ग म्हणजे मृत्यूच्या दाढेतून प्रवास केल्याचा अनुभव देत असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत. खेडशी, रेल्वे स्टेशन परिसरासारख्या काही मोजक्या ठिकाणी पथदिवे असल्यामुळे जनावरे किमान नजरेस पडतात; मात्र अनेकदा हे दिवेही बंद असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
याहूनही चिंताजनक बाब म्हणजे खेडशी ते हातखंबा या संपूर्ण पट्ट्यात महामार्ग अंधाराच्या विळख्यात आहे. प्रकाशव्यवस्थेचा पूर्ण अभाव आणि त्यात रस्त्यावर मुक्त संचार करणारी जनावरे, हे अपघातांना निमंत्रण देणारे चित्र आहे. महामार्ग हा सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी असतो; तो जनावरांचा मुक्त संचाराचा मार्ग बनू लागला, तर विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. महामार्ग उभारणाऱ्या ठेकेदाराने हातखंबा ते रेल्वे स्टेशन या संपूर्ण मार्गावर सक्षम पथदिवे उभारणे अपेक्षित होते. तसेच जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित विभागांनी समन्वय साधून उनाड गुरांच्या कायमस्वरूपी व्यवस्थापनासाठी ठोस मोहीम राबविण्याची आता गरज आहे.
गंभीर समस्येकडे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देणार?
खेडशी ते हातखंबा या महामार्गावरील संपूर्ण पट्ट्यात पथदिव्यांचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर अक्षरशः काळोख पसरत असल्याने रस्त्यावर वावरणारी उनाड गुरे आणि भटकी जनावरे वाहनचालकांना वेळेवर दिसत नाहीत. परिणामी, अपघातांचा धोका अनेकपटीने वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या महामार्गावर महत्वाच्या भागातच मूलभूत प्रकाशव्यवस्थाच नसणे ही शोकांतिका मानली जात आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन खेडशी ते हातखंबा दरम्यान पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

