(लांजा /रत्नागिरी)
पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने विवाहित महिलेला पतीच्या ताब्यातून पळवून नेल्याची तक्रार लांजा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणामुळे लांजा शहरातील आदर्शनगर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी चंद्रकांत शंकर कांबळे (५७, रा. आदर्शनगर, लांजा; मूळ रा. पनस बौद्धवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद माणिक सावंग (५६) हे आदर्शनगर, लांजा येथे पत्नी उर्मिला विनोद सावंग (४९) यांच्यासोबत राहतात. फिर्यादी विनोद सावंग यांच्या म्हणण्यानुसार, संशयित चंद्रकांत कांबळे आणि त्यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. याबाबत यापूर्वी सावंग यांनी कांबळे याच्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी संशयिताने आपल्याला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
दरम्यान, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास उर्मिला सावंग यांना संशयिताने फूस लावून किंवा प्रवृत्त करून पतीच्या ताब्यातून पळवून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पत्नी ही विवाहित असून ती आपली पत्नी असल्याची माहिती संशयिताला असतानाही तिला घरातून घेऊन गेल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
महिलेला पतीपासून दूर नेऊन तिचा ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचा तसेच तिला बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्याचा संशयिताचा हेतू असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर फिर्यादीने लांजा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी चंद्रकांत कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम १४०(३), ८४, २११(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपहरित महिलेचा शोध आणि प्रकरणाच्या पार्श्वभूमीचा पुढील तपास लांजा पोलिसांकडून सुरू आहे.


