(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
उत्कृष्ट पोलीस निरीक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी राहुलशेठ जयप्रकाश कोकाटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संगमेश्वर (नावडी) येथे नुकताच हा सदिच्छा भेटीचा आणि सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
अमित यादव यांनी यापूर्वी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सुमारे दीड वर्ष कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी सलोख्याचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण करण्यावर भर दिला होता. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची पावती म्हणून हा स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवातही यादव यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. त्यांनी ४० ते ५० हून अधिक कुटुंबांच्या घरी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.
उत्सवाच्या काळात समाजातील विविध घटकांशी साधलेला संवाद आणि समन्वय यामुळे पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यास मदत झाली. ‘पोलीस म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नव्हे, तर समाजाचा विश्वास जपणारी व्यवस्था’ या भूमिकेला त्यांच्या कार्यपद्धतीतून अधोरेखित करण्यात आले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सदिच्छा भेटीप्रसंगी महिला सुरक्षा समितीच्या सदस्या तसेच ‘साप्ताहिक पोलीस तपास’च्या रत्नागिरी जिल्हा मुख्य प्रतिनिधी अर्चिता राहुल कोकाटे आणि बालिका आर्या कोकाटे उपस्थित होत्या.
यावेळी पोलीस प्रशासन, कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा या विषयांवर सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ होणे ही सुरक्षित आणि सुसंवादी समाजव्यवस्थेसाठी आवश्यक बाब असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी संगमेश्वरवासीयांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. नागरिकांनी दिलेले प्रेम आणि विश्वास हीच आपल्या कार्याची खरी प्रेरणा असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.


