(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव महिंद्रा कारने कामगाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ नजीक ही घटना घडली. गोपाल मुरमु (४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमु हे लांजा उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करीत होते. त्याचवेळी महिंद्रा कार (क्र. केए ०३ एसी ३६००) घेऊन मौला कासम शेख (३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर; सध्या रा. मुस्त्रगवाडा, रत्नागिरी) हा उड्डाणपुलावरून जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालविल्याने कारने काम करणाऱ्या मुरमु यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या मुरमु यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालकाने जखमी कामगाराला मदत न करता तसेच पोलिसांना तत्काळ माहिती न देता घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील कामाच्या ठिकाणी वाहनचालकांकडून सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चालक मौला कासम शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी घटनास्थळाचे चित्रीकरणही करण्यात आले. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये आरोपी चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव पुढील तपास करीत आहेत.


