(लांजा)
सावर्डे येथून काम आटोपून भांबेडमार्गे खोरनिनकोकडे जात असताना एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संदेश शरद रहाटवल (वय २५, रा. खोरनिनको, ता. लांजा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास खोरनिनको रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश रहाटवल हे सावर्डे येथून काम आटोपून दुचाकीवरून भांबेडमार्गे खोरनिनकोकडे येत होते. दरम्यान रस्त्यावर अचानक दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तेथील सरपंच मुकेश गुरव यांनी तात्काळ मदत करत जखमीला ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघाताची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

