(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पगारवाढ, कायदेशीर भत्ते आणि आवश्यक सोयी-सुविधांच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सीएनजी टँकर चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. कालपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर होऊ लागला असून, जिल्ह्यातील अनेक सीएनजी पंपांवर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सीएनजी टँकर चालकांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सीएनजी हा संवेदनशील आणि ज्वलनशील वायू असल्याने त्याची वाहतूक करताना चालकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. अशा परिस्थितीत अत्यंत दक्षतेने आणि जबाबदारीने टँकर चालवून प्रत्येक फेरी सुरक्षितपणे पूर्ण करीत असल्याचे चालकांनी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, या जोखमीच्या कामासाठी सध्या चालकांना मासिक २० हजार रुपये वेतन मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाढती महागाई, प्रवासाचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या वाढत्या आर्थिक गरजा लक्षात घेता या वेतनात घरखर्च भागविणे कठीण होत असल्याची व्यथा चालकांनी व्यक्त केली आहे.
चालकांनी सध्याच्या २० हजार रुपयांच्या मासिक वेतनात १० हजार रुपयांची वाढ करून ३० हजार रुपये वेतन करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली आहे. यासोबतच प्रत्येक महिन्याचा पगार निश्चित तारखेला, म्हणजेच ५ तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी बँक खात्यात जमा करावा आणि प्रत्येक चालकाला अधिकृत वेतन पावती द्यावी, अशीही मागणी आहे. चालकांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) या कायदेशीर सुविधा तातडीने लागू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. सीएनजी टँकरची वाहतूक अनेकदा दीर्घ पल्ल्याची आणि वेळखाऊ असते. ड्युटीदरम्यान किंवा रात्रीच्या वेळी चालकांना विश्रांती घेण्यासाठी प्रत्येक सीएनजी पंपावर बसण्याची तसेच झोपण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चालकांनी केली आहे. याशिवाय अत्यंत संवेदनशील आणि ज्वलनशील वायूची वाहतूक करत असल्याने चालकांना दरमहा विशेष जोखीम भत्ता देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सीएनजी पुरवठ्याची साखळी सुरळीत ठेवण्यात चालकांची भूमिका महत्त्वाची असतानाही त्यांच्या वेतन आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भूमिका चालकांनी घेतली आहे. आपल्या मागण्यांचा कंपन्यांनी सकारात्मक विचार करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे सीएनजी टँकरची वाहतूक प्रभावित झाल्याने जिल्ह्यातील काही पंपांवर पुरवठ्याचा ताण जाणवू लागला आहे. आंदोलन किती काळ सुरू राहते आणि कंपन्या चालकांच्या मागण्यांवर कोणता निर्णय घेतात, याकडे आता वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.


