(लांजा)
तालुक्यातील कोत्रेवाडी येथे प्रस्तावित असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला शिवसेना उबाठा पक्षाने जोरदार विरोध केला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने या प्रकरणी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन डम्पिंग ग्राऊंड कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.
या डम्पिंग ग्राऊंडसाठी लांजा नगर पंचायतीने दहा एकरचा भूखंड खरेदी आहे, मात्र जुन्या समितीने रद्द केलेला भूखंड नव्या समितीने पुन्हा कसा मंजूर केला, यावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रक्रियेत अनेक अनियमितता असल्याचा आरोप त्यांनी केला. कोत्रेवाडी परिसरात हजारो झाडे, पाण्याचे स्रोत आणि अनेक घरे असताना अशा ठिकाणी घनकचरा प्रकल्प कसा मंजूर केला जाऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला. काहीही झाले तरी आम्ही लांजा कोत्रेवाडीमध्ये डम्पिंग ग्राऊंड होऊ देणार नाही. त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते बाळ माने, उल्का विश्वासराव, रवी डोळस, जिल्हाप्रमुख दत्ता कदम, काँग्रेसचे अशोकराव जाधव आदी उपस्थित होते.
आचारसंहिता काळातील पेमेंटवर घेतला आक्षेप
माजी खा. राऊत यांनी या प्रकरणात झालेल्या आर्थिक व्यवहारांवरही आक्षेप घेतला. आचारसंहितेच्या काळात या प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपयांचे पेमेंट कसे झाले, असा प्रश्न त्यांनी विचारला. या अनियमिततेसाठी लांजा नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

