(चिपळूण/ रत्नागिरी)
कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली ४० वर्षीय महिला घरी परतलीच नसल्याने खळबळ उडाली आहे. रूपाली मारुती जाधव (वय ४०, रा. दत्तछाया निवास, खेर्डी, चिपळूण) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने तिला गुप्तपणे व गैरप्रकारे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्यासोबत राहणाऱ्या अनंत विठ्ठल रहाटे (वय ४५) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अनंत रहाटे आणि रूपाली जाधव हे गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून खेर्डी येथील दत्तछाया निवासातील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रूपाली जाधव या शिवराज ढाबा येथे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. बराच वेळ उलटूनही रूपाली जाधव घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे तसेच परिचितांकडे शोध घेण्यात आला. परिसरातही चौकशी करण्यात आली; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर अज्ञात व्यक्तीने रूपाली जाधव यांना गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. संशयित आरोपीचे नाव व गाव समजले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली जाधव यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, त्या नेमक्या कुठे गेल्या आणि त्यांच्या बेपत्ता होण्यामागे काय कारण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.


