(लांजा)
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे प्रभानवल्ली (गोसावीवाडी) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता नदी पार करताना एक व्यक्ती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी दोन व्यक्ती नदी पार करत असताना अचानक पाण्याचा वेग वाढला. यामध्ये एक जण सुखरूप बाहेर पडला, मात्र दुसरा व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी, तहसीलदार तसेच महसूल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील खेगडे कुटुंबीय गणेशोत्सवानिमित्त गावी आले होते. त्यातील दोन सख्खे चुलत भाऊ – मिलिंद विजय खेगडे (वय २८) आणि केतन श्रीपत खेगडे (वय ३५) सकाळी साडेनऊ वाजता सिद्धेश्वर देवस्थानात दर्शनासाठी गेले होते.
दर्शन करून परत येताना त्यांना मोठ्या वहाळातून जावे लागले. मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे वहाळाला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पुराच्या प्रवाहात सापडले. यामध्ये मिलिंद खेगडे सुखरूप बाहेर पडला, पण केतन खेगडे हा प्रचंड प्रवाहात वाहून गेला. या घटनेने मिलिंद याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ बगळे, तहसीलदार व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारपासून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पथक सतत प्रयत्न करत आहेत. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत केतन खेगडे याचा शोध लागलेला नव्हता.
स्थानिक ग्रामस्थ आणि तरुण मंडळींच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

