(रत्नागिरी / वैभव पवार)
श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडियम स्कुल, वेरळ, ता. खेड, जि. रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता दहावी नंतर काय? या विषयांवर मार्गदर्शन करताना व्याख्याते माधव विश्वनाथ अंकलगे यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच येणाऱ्या पन्नास वर्षात ज्या करिअर मध्ये भविष्य आहे, त्याच करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने करिअर विद्यार्थ्यांनी निवडावे असे आवाहन केले.
आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स या विभागातील करिअर सोबतच आपली आवड, आपली क्षमता, त्या – त्या करिअरची उपलब्धता यावर भर देऊन निवड करण्यात यावी अशी माहिती दिली. तसेच वरील क्षेत्रासह अन्य असंख्य क्षेत्र आहेत, त्यावरही भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच करिअर निवड न करता आपण अभ्यास करणे हे करिअरच्या यशप्राप्तीतील मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे भविष्याची निश्चितता लक्षात घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच इयत्ता दहावीच्या वर्गात परीक्षेला सामोरे जाताना ताण – तणाव न घेता वेळ, विषयाची काठिण्यपातळी, आहार आणि आरोग्य यांचा समन्वय साधून अभ्यासाचे नियोजन केल्यास यश गाठता येते असे मत व्यक्त करत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला श्री समर्थ कृपा इंग्लिश मेडियम स्कुल वेरळचे अध्यक्ष सुयश पाष्टे, उपाध्यक्ष सुप्रिया पाष्टे, सचिव शेटवे, प्राचार्य, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जोशी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

