(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी आज सकाळी साडेसात वाजता रत्नागिरी शहरातील नामांकित दामले विद्यालयाला अचानक भेट देत शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. शिक्षणमंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या भेटीदरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेच्या नियमित परिपाठात सहभाग घेतला. विविध परीक्षा तसेच स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षणमंत्री भुसे यांनी शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक कामकाज आणि एकूण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याचे कौतुक केले.
आपल्या मनोगतात दादा भुसे म्हणाले, “नगरपरिषद शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयाचा चढता आलेख आणि १,६४५ विद्यार्थ्यांची पटसंख्या ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्राने या शाळेचा आदर्श घ्यावा, अशी ही शाळा आहे. अशा शाळेला भेट देताना मला विशेष आनंद होत आहे. रत्नागिरीसारख्या शहरात इतर शाळांनी आदर्श घ्यावा, अशी शाळा उभी राहिली आहे.”
यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती मा. मूरकर, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, नगरपरिषद शिक्षण विभागाचे श्री. मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद संसारे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.
दामले विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीची आणि वाढत्या विद्यार्थी पटसंख्येची राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतलेली दखल ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली. त्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


