(खेड / वार्ताहर)
खेड तालुक्यातील लोटे-परशुराम एमआयडीसी परिसरातील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या ताब्यात घ्यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीची गंभीर दखल घेत उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती वैभव खेडेकर यांनी दिली.
आमदार प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या सहकारी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सीईटीपी प्रकल्पाच्या व्यवस्थापनात सांडपाणी प्रक्रिया, यंत्रसामग्रीची देखभाल आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत अपेक्षित दक्षता घेतली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पर्यावरणीय निकषांचे पालन, जलस्रोतांचे संरक्षण आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, एमआयडीसीकडे आवश्यक तांत्रिक क्षमता, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सक्षम प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असल्याने हा प्रकल्प एमआयडीसीच्या ताब्यात दिल्यास त्याचे संचालन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांनुसार करता येईल. त्यामुळे औद्योगिक सांडपाण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होऊन पर्यावरण संरक्षणालाही मोठी मदत होईल.
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोटे-परशुराम एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाच्या व्यवस्थापनात लवकरच महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय झाल्यास औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, तसेच प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरेल.

