(चिपळूण / वार्ताहर)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सबलीकरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. खरवते येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपा मयेकर या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. डॉ. रूपा मयेकर (MBBS) यांनी उपस्थित महिला आणि युवतींना सामाजिक तसेच आरोग्यविषयक विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले.
मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, या कालावधीत शरीराची योग्य काळजी कशी घ्यावी आणि मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून आरोग्याला प्राधान्य कसे द्यावे, याबाबत डॉ. मयेकर यांनी सविस्तर माहिती दिली. महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दैनंदिन जीवनातील पोषक आहाराचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
वाढत्या डिजिटल वापरामुळे निर्माण होणाऱ्या ‘मोबाइल ॲडिक्शन’ अर्थात मोबाइलच्या व्यसनाच्या समस्येवरही त्यांनी विशेष प्रकाश टाकला. मोबाइलचा अतिवापर टाळण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करण्याच्या सोप्या आणि प्रभावी उपाययोजना त्यांनी सांगितल्या. तसेच मोबाइलच्या अतिवापराला पर्याय म्हणून पुस्तके वाचण्याची सवय कशी विकसित करता येईल आणि वाचनाचा मानवी मेंदूच्या विकासावर कसा सकारात्मक परिणाम होतो, याबाबत त्यांनी शास्त्रीय माहितीच्या आधारे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. श्रद्धा डावळे हिने केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी कु. हर्षा राजपूत हिने उत्तमरीत्या पार पाडली, तर कार्यक्रमाच्या शेवटी कु. स्वरांजली रामशे हिने उपस्थितांचे आभार मानले.


