(चिपळूण)
तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला येथे जुन्या जमीन वादातून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. अंगणात कचरा टाकल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात एका वृद्ध दाम्पत्याला लाकडी काठी आणि दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या असून एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैमुना इस्माईल बोंदले (५२) आणि आरोपी हे शेजारी असून त्यांच्यात जमीन वाद सुरू होता. २८ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८ वाजता अरबिना खान हिने बोंदले यांच्या अंगणात कचरा टाकल्याचा आरोप आहे. याबाबत जाब विचारल्यावर वाद वाढला आणि अरबिना हिने दगडाने मैमुना यांच्या तोंडावर मारहाण केली.
यावेळी मैमुना यांचे पती इस्माईल बोंदले मध्यस्थी करण्यासाठी आले असता, इतर आरोपींनी त्यांना घेरून मारहाण केली. मन्सूर अली खान याने लाकडी काठीने इस्माईल यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. इतरांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेनंतर मैमुना बोंदले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी
अरबिना खान, मन्सूर अली खान, माहिल अझीम खान, जमीर खान, राहिल अझीम खान, शरीफा अली खान आणि शबाना मन्सूर खान या सात जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या बाजूनेही तक्रार
दरम्यान, शबाना मन्सूर खान (४२) यांनी दिलेल्या प्रतितक्रारीनुसार, वादाच्या वेळी मैमुना व इस्माईल बोंदले यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर खड्डा खणण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचारणा केल्यावर दोघांनी शिवीगाळ केली.
तक्रारीनुसार, इस्माईल बोंदले हे हातात कोयता घेऊन आले आणि त्यांनी शबाना खान यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याची मूठ डोक्याला लागून त्या जखमी झाल्याचे सांगितले आहे. यानंतर शबाना यांच्या पती मन्सूर खान यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मैमुना बोंदले आणि इस्माईल बोंदले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन वादातून झालेल्या या घटनेमुळे वेहळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप झाल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

