(चिपळूण)
तालुक्यातील पालीकडून दळवटणे येथील रामवाडी परिसरात बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण वणवा लागल्याची घटना घडली. काही वेळातच आगीने उग्र स्वरूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
या वणव्यामुळे परिसरातील आंबा कलमे तसेच इतर फळबागा आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शेतकरी आणि बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे नदी परिसरात चरण्यासाठी गेलेली गुरेही आगीच्या कचाट्यात अडकल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीपराव कदम, रमेश शिंदे, रमेश महाडिक, रमेश पवार, वैभवी थोरे, साक्षी मोहिते यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सध्या वणवा पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, वणव्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शेतकरी व बागायतदारांवर आर्थिक संकट ओढावले असून, तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

