(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
मरणोत्तर देहदानाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला हातभार लावण्याचा आदर्श रत्नागिरीतील आगाशे कुटुंबीयांनी जपला. आगाशेवाडा येथील विजया नारायण आगाशे (९१) यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचा देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीकडे अभ्यास व संशोधनासाठी सुपूर्द केला. या देहदानामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ व्या मरणोत्तर देहदानाची नोंद झाली.
विजया आगाशे यांचे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यापूर्वी त्यांनी १७ जून २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र नोंदविले होते. त्यांच्या इच्छेचा सन्मान करत कुटुंबीयांनी ७ ऑक्टोबर रोजी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करता यावा तसेच वैद्यकीय संशोधनासाठी त्याचा उपयोग व्हावा, या व्यापक सामाजिक आणि शैक्षणिक उद्देशाने हे देहदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात देहदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कृती ठरली आहे. या वेळी विजया आगाशे यांचे पुत्र मुकुंद आगाशे, विवेक आगाशे, तसेच नातू हर्षद आगाशे, नितीन महाबळ आणि ऐश्वर्या आगाशे उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर, वाहनचालक प्रीतम भोसले, प्रथमेश पवार आणि नितीन घोसाळकर यांनी देहदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले. विजया आगाशे यांनी मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयुक्त ठरावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी ती प्रत्यक्षात उतरवून ‘मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान’ देण्याचा आदर्श घालून दिला आहे.


