( रत्नागिरी / वार्ताहर )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न उद्यानविद्या महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत वायंगणी गावात “गोकृपा अमृतम्” तयार करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
हे प्रात्यक्षिक श्री. निखिल शिंदे आणि श्री. विजय शिंदे यांच्या शेतावर पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना गोकृपा अमृतम् तयार करण्याची पद्धत, त्यासाठी लागणारे घटक, वापरण्याची योग्य पद्धत तसेच त्याचे पिकांवरील फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, गोकृपा अमृतम् हे सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त जैविक द्रावण असून ते जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ करण्यास मदत करते. तसेच मातीची सुपीकता वाढविणे, पिकांची जोमदार वाढ होणे आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे यासाठीही ते प्रभावी ठरते. प्रात्यक्षिकाद्वारे त्याची प्रत्यक्ष निर्मिती करून दाखविण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. वाढता उत्पादन खर्च, मातीचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता सेंद्रिय शेती ही भविष्यातील शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठेत वाढती मागणी असल्याने शेतकऱ्यांनी अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच श्रीरंग भडेकर, वरुण सावंत, योगेश गायकवाड, कौस्तुभ इंदप, अथर्व कांबळे, साहिल भोसले, ओंकार हाके आणि प्रणय भटकर हे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी या उपयुक्त कृषी मार्गदर्शन उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

