(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील कदमवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला डंपरने दिलेल्या जबर धडकेत रिक्षाचालक आणि एक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाहीद अली अब्दुल रहीम धामस्कर (वय ५०, रा. मजगाव, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ क्यू ७१६८) घेऊन मेस्त्री हायस्कूल ते मजगाव या मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करत होते. त्यांच्या रिक्षामध्ये मेस्त्री हायस्कूलमधील तीन विद्यार्थी होते. सायंकाळी अंदाजे चारच्या सुमारास रिक्षा कदमवाडी येथे पोहोचली असता, मजगाववरून रत्नागिरीकडे वेगाने येणाऱ्या एका डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात रिक्षाचालक जाहीद धामस्कर आणि रियान सावकार हा विद्यार्थी जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने इतर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, डंपरचालकाविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
या अपघातानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेच्या वेळेत रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

