(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील प्रमुख लोकउत्सव मानल्या जाणाऱ्या ‘शिमगोत्सवा’च्या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईसह इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या खासगी वाहनांनी कोकणात दाखल होत आहेत. परिणामी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची मागणी लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंधन वितरण व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेतली असून Mahanagar Gas Limited (एमजीएल), Hindustan Petroleum Corporation Limited (एचपीसीएल), Bharat Petroleum Corporation Limited (बीपीसीएल) आणि Indian Oil Corporation Limited (आयओसीएल) या प्रमुख तेल कंपन्यांच्या जिल्हा प्रतिनिधींना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा पुरेसा साठा राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत इंधन तुटवडा भासणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. इंधन वितरण करताना रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिमगोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने सर्व पंपांवर हवा, पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा मोफत व सुलभ उपलब्ध ठेवावी, असे आदेश आहेत. विशेषतः महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि २४ तास उपलब्ध स्वच्छतागृहांची जबाबदारी पंप चालकांवर सोपविण्यात आली आहे.
नियोजन व मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश
गर्दीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक तेवढा कर्मचारी वर्ग तैनात ठेवावा. तसेच कामकाजाच्या वेळा पंप परिसरात स्पष्ट फलकाद्वारे दर्शविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर व हँडपंप यंत्रणा तत्पर ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून कोणत्याही अडथळ्याविना इंधन पुरवठा सुरू राहील, याची खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सर्व इंधन कंपन्यांनी पंप चालकांशी सतत संपर्क ठेवून सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

