(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे १३ नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातातील जखमींपैकी आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रघुवीर बाळकृष्ण म्हसूरकर (वय ३३, रा. आडवशी तांबळवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेमुळे अंजणारी अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढला असून, या भीषण दुर्घटनेने महामार्गावरील प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
१३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंजणारी पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासी ट्रॅव्हल्स आणि भरधाव १६ चाकी ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला होता. ट्रॅव्हल्समधून प्रवासी प्रवास करीत असताना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २२ प्रवासी आणि ट्रकचालक असे एकूण २३ जण जखमी झाले होते अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या रघुवीर म्हसूरकर यांच्यावर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार केले जात असतानाच त्यांची प्रकृती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आडवशी तांबळवाडी परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटातील धोकादायक वळण आणि तीव्र उतार वाहनचालकांसाठी सातत्याने जीवघेणे ठरत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत असतानाच आता उड्डाणपुलाचा पर्याय पुढे आला आहे. या ठिकाणी सुमारे २१ कोटी रुपये खर्चून १०० मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अपघातांच्या छायेत असलेल्या या धोकादायक वळणाला पर्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यापलीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अंजणारीच्या उतारावर अपघातांची मालिका सुरूच असताना शासन आणि प्रशासनाने केवळ प्रस्तावांच्या पातळीवर न थांबता तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी हातखंबा टॅब परिसरात पोलिसांच्या वाहनाचा अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच अंजणारी येथे पुन्हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २३ जण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे महामार्गाच्या रचनेतील संभाव्य त्रुटींची तांत्रिक तपासणी करून उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी जोर धरत आहे. आणखी किती निष्पाप जीव गमावल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.


