(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरुख–मार्लेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खडी घेऊन जाणाऱ्या डंपरचा निवेखुर्द येथे भीषण अपघात झाला. निंबेरा पुलाच्या पुढील चढावावर अचानक डंपरचा एक्सल तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर डंपर भरधाव वेगाने मागे येत पुलाचा सिमेंटचा कठडा तोडून थेट खोल नदीपात्रात कोसळला. बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चालक आणि क्लिनर जखमी झाले.
देवरुख–मार्लेश्वर–कळकदरा मार्गावरील आंगवली परिसरात सध्या रस्ते रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारी खडी घेऊन डंपर देवरुखहून आंगवलीच्या दिशेने निघाला होता. निवेखुर्द येथील निंबेरा पुलाच्या पुढील चढावावर डंपर पोहोचला असता अचानक त्याचा एक्सल तुटला. एक्सल तुटल्याने डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर पुढे जाण्याऐवजी वेगाने पाठीमागे सरकू लागला. चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र डंपर थेट निंबेरा पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळला. कठडा तोडत डंपर पुलावरून खाली खोल नदीपात्रात कोसळला. डंपर नदीपात्रात कोसळताच परिसरात मोठा आवाज झाला.
अपघाताचा आवाज ऐकताच तसेच घटनास्थळाचे दृश्य पाहताच मार्गावरून ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आणि वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखून काही नागरिक नदीपात्रात उतरले आणि डंपरमध्ये अडकलेल्या चालक व क्लिनरला बाहेर काढले. या अपघातात चालक आणि क्लिनर जखमी झाले असून, दोघांनाही तातडीने देवरुख येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नदीपात्रात कोसळलेल्या डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, अपघातामुळे काही काळ घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. डंपर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


