(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा परेश सरफरे हिने आपल्या अद्वितीय जलतरण कौशल्याने संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भारतातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद मिळवत वेदाने एक नवा इतिहास घडवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनीही तिचा विशेष सन्मान केला.
रत्नागिरीच्या अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांच्या वेदा परेश सरफरे हिने जलतरण क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करत ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये भारतातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून आपले नाव नोंदवले आहे. अवघ्या १० मिनिटे ८ सेकंदांत १०० मीटर अंतर पोहत पूर्ण करत तिने हा विक्रम आपल्या नावावर केला असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वयाच्या अत्यंत लहान टप्प्यात मिळवलेली ही कामगिरी केवळ रत्नागिरीसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. वेदाच्या जिद्दीने, मेहनतीने आणि तिच्या पालकांच्या प्रोत्साहनामुळे हा विक्रम शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
या यशाबद्दल राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी वेदा सरफरे आणि तिच्या पालकांची भेट घेत विशेष अभिनंदन केले. यावेळी त्यांनी वेदाचा सन्मान करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात जागतिक स्तरावरील ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही तिचे नाव झळकावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी वेदाचे वडील परेश सरफरे, सरफरे कुटुंबीय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. वेदाच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

