(पणजी / वृत्तसंस्था)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोव्यातील डोना पावलामधील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. पण, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिली आहे. पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे
मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना सलग सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या प्रकरणी मेडिको-लीगल केस (MLC) नोंदवण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर हे मराठी रंगभूमीपासून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करणारे अभिनेते होते. गंभीर, समांतर, विनोदी तसेच खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मराठीतील ‘नटसम्राट’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
नाना पाटेकर यांनी जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक जाहिरात क्षेत्रात काम केले. अभिनयाची खरी सुरुवात प्रायोगिक आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवरून झाली. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या दमदार अभिनयाची चुणूक दिसली. ‘पुरुष’ नाटकातील त्यांची खलनायकी भूमिका विशेष गाजली. १९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास
नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जडणघडण रंगभूमीवर झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘गिद्ध’, ‘भालू’ आणि ‘शीला’ यांसारख्या चित्रपटांतही भूमिका केल्या. मात्र या चित्रपटांना विशेष यश मिळाले नाही.
राज बब्बर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘आज की आवाज’ या चित्रपटात नाना पाटेकर यांनी सहनायकाची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले; मात्र चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर १९८६ मध्ये एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’ या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला महत्त्वपूर्ण वळण मिळाले. या चित्रपटात त्यांनी बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या सरळमार्गी युवकाची भूमिका साकारली. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय भूमिकांपैकी एक ठरली.
‘सलाम बॉम्बे!’ आणि ‘परिंदा’ने मिळवून दिली वेगळी ओळख
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटातील भूमिकेमुळे नाना पाटेकर यांच्याकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर १९८९ मधील ‘परिंदा’ हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातील ‘अण्णा’ या व्यक्तिरेखेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दमदार संवादफेक आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे सामावून जाण्याची त्यांची शैली यामुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रभावी अभिनेत्यांमध्ये गणले जाऊ लागले.
‘नटसम्राट’ या भूमिकेमुळेही नाना पाटेकर यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. रंगभूमीवरील नटसम्राटाची व्यक्तिरेखा त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रभावीपणे साकारली. त्यामुळे नाना पाटेकर हे नाव मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी या दोन्ही क्षेत्रांशी घट्ट जोडले गेले.
अभिनयासोबत सामाजिक कार्याचीही ओळख
नाना पाटेकर केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठीही परिचित होते. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना मदत आणि जलसंधारणासह विविध सामाजिक उपक्रम राबवले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबरोबरच ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या कामांमध्येही त्यांनी योगदान दिले.
मराठी रंगभूमीपासून सुरू झालेला प्रवास हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर यांच्या निधनाने आता थांबला आहे. त्यांच्या निधनाने रंगभूमी, मराठी चित्रपटसृष्टी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रभावी अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


