(नवी मुंबई / वृत्तसंस्था)
नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात केळी कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी इथेफॉनयुक्त रसायनाचा थेट वापर केला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत समोर आले आहे. तुर्भे येथील सेक्टर-१९ मधील गाळा क्रमांक एन-९१९ येथे करण्यात आलेल्या तपासणीत केळी इथेफॉनच्या द्रावणात थेट बुडवून पिकविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत विक्रीसाठी ठेवलेली एकूण १ हजार ३९४ किलो केळी जप्त करण्यात आली असून, त्यांची अंदाजे किंमत ६७ हजार ८१४ रुपये आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
एफडीएच्या कोकण विभाग परिमंडळ-३ ला एपीएमसी फळ बाजारात रसायनांचा वापर करून फळे पिकवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी दुपारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंच साक्षीदारांसह सेक्टर-१९ मधील गाळा क्रमांक एन-९१९ येथे तपासणी केली. या वेळी केळी इथेफॉनच्या द्रावणात बुडवून पिकविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
चौकशीदरम्यान संबंधित विक्रेत्याने केळी पिकविण्यासाठी ५ लिटर पाण्यात रसायन मिसळून द्रावण तयार केल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. कारवाईदरम्यान विक्रीसाठी साठवून ठेवलेला केळ्यांचा उर्वरित साठाही जप्त करण्यात आला. त्यामध्ये सुंदरी जातीची १९८ किलो, ईलायची जातीची ४९८ किलो आणि खट्टामीठा जातीची ६९८ किलो केळी होती. अशा प्रकारे एकूण १ हजार ३९४ किलो केळी जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या केळ्यांमधून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तीन नमुने घेतले. तसेच केळी पिकविण्यासाठी तयार केलेल्या रसायनमिश्रित द्रावणाचा सर्वेक्षण नमुनाही घेण्यात आला. हे नमुने तपासणीसाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले आहेत. रसायनाच्या तपासणीत ते बनावट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कृत्रिमरित्या पिकविलेली फळे ओळखताना फळाचा रंग अतिशय एकसारखा, पिवळा किंवा आकर्षक दिसत असला तरी ते आतून कच्चे किंवा कठीण असण्याची शक्यता असते. अशा फळांमध्ये नैसर्गिक गोडवा कमी जाणवू शकतो आणि चव फिकी किंवा तुरट लागू शकते. सालीवर ठिपके, डाग किंवा असमान रंग दिसण्याची शक्यता असते. देठाजवळील भाग हिरवट राहून उर्वरित भाग वेगाने पिकलेला दिसू शकतो. नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांच्या तुलनेत अशी फळे तुलनेने लवकर खराब होऊ शकतात.


