( मुंबई )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत येणाऱ्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात आणि प्रशासकीय इमारतींमध्ये दर 15 दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आणि एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या स्वच्छता मोहिमेत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष यांची सखोल स्वच्छता केली जाणार आहे. तसेच साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे, जाहिरातींचे फलक, जाळी-जमट यांचे निर्मूलन करून परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कचराडबे उपलब्ध करून कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण व शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावली जाणार आहे. प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी नियमित स्वच्छता व देखभाल ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
ही स्वच्छता मोहीम स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी होईल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे.
दर 15 दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार असून प्रवासी सेवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटीवर प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

