(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे शहर पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षक निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५) यांनी औंध परिसरातील नागरस रोड येथील राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
निलेश पाटील सध्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते बुधवारी उच्च न्यायालयातील कामासाठी मुंबईला जाणार होते. मात्र, ते मुंबईला गेले नाहीत आणि नागरस रोड येथील त्यांच्या घरीच होते. घरात त्यांचा मुलगाही उपस्थित होता. दुपारी गोळीचा आवाज ऐकून मुलगा धावत आला असता सोफ्यावर निलेश पाटील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. निलेश पाटील यांनी स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.
निलेश पाटील हे पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून भरती झाले होते. अनेक वर्षांच्या सेवेनंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. सध्या त्यांची नियुक्ती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होती.
निलेश पाटील यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते दीड महिने सुट्टीवर होते. त्यानंतर गणपती बंदोबस्तासाठी ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक वाद, कामाचा ताण किंवा अन्य वैयक्तिक कारण यापैकी नेमके काय कारण होते, याचा पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत.
पोलिस उपनिरीक्षकाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने पुणे पोलिस दलात आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


