(सातारा / वृत्तसंस्था)
अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार फलटणमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलिसांनी सौरभ नाना मदने (25) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या प्रकरणामुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आरोपीला अटक झाल्यानंतर पीडित कुटुंबाला धमकीचे पत्र मिळाल्याचेही समोर आले आहे. ‘सौरभ गुरूवरची केस मागे घ्या, नाहीतर अमावास्येच्या आत सर्व कुटुंब संपवणार,’ अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे. पत्रांवर लिंबू ठेवून ते पीडित मुलीच्या घराबाहेरील झाडाच्या कुंडीत ठेवण्यात आले होते. हे धमकीचे पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फलटण शहरातील बुधवार पेठेत राहणारा सौरभ नाना मदने हा जादूटोणा करून लोकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांनी दिली. पीडित मुलीच्या कुटुंबाची आरोपीसोबत ओळख होती. त्याने कुटुंबाच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगितले. त्यानंतर जादूटोणा करून भूत काढल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या अंगातील कथित भूत काढण्याच्या बहाण्याने संशयिताने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला एका जुन्या घरात नेले. तेथे आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत या घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
बदनामीची भीती आणि भोंदूबाबाने दिलेल्या धमकीमुळे पीडित मुलगी घरातून निघून वाई येथे गेली होती. तेथील एका अनोळखी व्यक्तीने तिला वाई पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधला. त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
मुलीने सांगितलेला प्रकार समोर आल्यानंतर तिच्या आईने फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सौरभ नाना मदनेविरुद्ध पोक्सो आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


