(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी येथे झालेल्या १७ व १९ वर्षे वयोगटातील शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम परशुराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर संस्थेच्या सात खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत तन्मय हर्षल घाणेकर याने लांब उडीत प्रथम, तर ट्रिपल जंपमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. यश वसंत घाणेकर याने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आदर्श दीपक मायंगडे याने लांब उडीत द्वितीय, तर अमन प्रदीप पाचकुडे याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
मुलींच्या गटात तनुजा हर्षल घाणेकर आणि सोनाली मोहन डिंगणकर यांनी लांब उडीत प्रथम क्रमांक मिळविला. कार्तिकी प्रवीण कांबळे हिने लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे या सातही खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक किशोर नलवडे आणि क्रीडाशिक्षक संतोष सनगरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक तसेच मुख्याध्यापक नितीन मोरे यांचे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक यांच्या वतीने संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी अभिनंदन केले.


