( मुंबई )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही. सरकारच्या धोरणांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हा विरोधकांचा लोकशाहीतील अधिकार असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विरोधी पक्षात असताना तत्कालीन सरकारवर सातत्याने टीका करत होते. त्यामुळे आज विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले किंवा टीका केली, तर त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याबाबत यापूर्वी झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचाही उल्लेख केला. “त्या वेळी महाराष्ट्राचा अपमान झाला नव्हता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुभवी नेते असून त्यांनी विरोधकांविषयी “भाडे के टट्टू” अशा शब्दांचा वापर करणे त्यांच्या पदाला आणि अनुभवाला शोभणारे नसल्याची टीकाही रोहित पवार यांनी केली.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेबाबतही स्पष्टता दिली. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कोणत्याही परिस्थितीत एनडीएमध्ये जाणार नाही आणि काँग्रेसमध्येही विलीन होणार नाही. महाराष्ट्रधर्म आणि जनतेच्या प्रश्नांसाठी पक्ष स्वतंत्रपणे संघर्ष करत राहील. पक्षाबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि दावे हे केवळ अफवा आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार विधानभवन परिसरात आले होते. त्यावेळी काही आमदारांशी चर्चा करण्यासाठी ते जवळील कार्यालयात गेले. माजी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पदाचा सन्मान राखत शरद पवार यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला. या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सभ्य राजकीय परंपरेचा भाग म्हणून पाहिले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
सरकारमधील काही आमदारांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी काही आमदार अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेले. मात्र, ज्यांनी त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवले त्या अजित पवारांनाच न्याय मिळावा यासाठी हेच आमदार पुढे येत नाहीत. सरकारमध्ये सहभागी असूनही सरकारलाच वारंवार पत्रे लिहावी लागत असतील, तर त्यातून त्यांच्या प्रभावाची आणि कार्यक्षमतेची कल्पना येते, असा टोला त्यांनी लगावला.

