(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, संगमेश्वर तालुका यांच्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ पासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मानधनातील सुधारणा, थेट बँक खात्यावर मानधन जमा करणे आणि विमा संरक्षण यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसह (मनरेगा) विविध कामांची अंमलबजावणी करण्यात ग्रामरोजगार सहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असते. गेल्या अनेक वर्षांपासून जबाबदारी पार पाडूनही त्यांच्या मानधनासह सेवा-सुविधांबाबत अपेक्षित निर्णय झालेला नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. अनेक कामांसाठी स्वखर्च करावा लागत असल्याने आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मानधनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे, मानधन थेट संबंधितांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करणे आणि ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा संरक्षण देणे यांचा समावेश आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका संघटनेने तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांचा विचार करून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, शासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होईपर्यंत घरकुल, फळबाग तसेच मनरेगाअंतर्गत अन्य कामांचे मस्टर काढू नयेत, अशी विनंतीही संघटनेने केली आहे. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाने प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामरोजगार सहाय्यक संघटना, संगमेश्वर तालुक्याने केली आहे.


