(संगमेश्वर /प्रतिनिधी)
देवरुख–साखरपा मार्गावरील वांझोळे येथे सोने व्यापाऱ्याला अडवून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या चर्चेतील दरोडा प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी वर्षभरानंतर छडा लावला आहे. पोलिसांना गुंगारा देत वर्षभरापासून फरार असलेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. कल्याण, नवी मुंबई आणि बारामती येथे स्वतंत्र कारवाया करत या चौघांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर दरोडा प्रकरणातील सर्वच्या सर्व १३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
सप्टेंबर २०२५ मध्ये सोने व्यापारी धनंजय केतकर हे देवरुख–साखरपा मार्गावरून जात असताना वांझोळे परिसरात दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवली होती. त्यानंतर धमकावत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण १३ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. देवरुख पोलिसांनी यापूर्वी नऊ आरोपींना अटक केली होती. मात्र, उर्वरित चार आरोपी पोलिसांना चकवा देत वर्षभरापासून फरार होते. त्यामुळे या आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला. आरोपींच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डचा (CDR) तसेच बँक खात्यांतील संशयास्पद व्यवहारांचा बारकाईने तपास करण्यात आला. या तांत्रिक तपासातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या सापळा रचत कल्याण, नवी मुंबई आणि बारामती येथे कारवाई केली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत चारही फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेश राया मोरे (३३, रा. कल्याण), तेजस रघुनाथ तांडेल (३१, रा. घाटकोपर, मुंबई), दशरथ मारुती साळुंखे (३९, रा. बदलापूर) आणि सचिन हरिभाऊ खुडे (४३, रा. बारामती) यांचा समावेश आहे. महेश मोरे आणि तेजस तांडेल यांना कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. दशरथ साळुंखे याला नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-२च्या मदतीने नवी मुंबईतून अटक करण्यात आली, तर सचिन खुडे याला बारामती येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी सचिन खुडे याच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात आल्याचे नमूद केलेली अर्टिगा कार (एमएच ४२ बीबी ७५६०) दोन पंचांसमक्ष जप्त केली आहे. या वाहनाचा गुन्ह्यातील वापर आणि इतर आरोपींची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे. वर्षभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या चारही फरार आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढत देवरुख पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सोने व्यापारी दरोडा प्रकरणातील तपासाला महत्त्वपूर्ण पूर्णविराम मिळाला आहे. सर्व १३ आरोपी जेरबंद झाल्याने या प्रकरणातील पुढील तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.


