(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे-चाफवली परिसराला गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार तडाखा दिला. या वादळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
सायंकाळी अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. देवळे येथील मठाजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने देवरुख-चाफवली एसटी बसला देवळेमधूनच माघारी फिरावे लागले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडप कोसळले, तर काही घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. देवळे परिसरातील महावितरणच्या वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
देवळे-चाफवली परिसरात मे महिन्यात आंबा आणि काजू हंगाम जोरात सुरू असतो. मात्र, या वादळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक मोठ्या प्रमाणावर झाडावरून गळून पडले. उरलेला आंबा पावसामुळे खराब होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या तुलनेत यावेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लग्नसराईमुळे उरलेली शेती मशागतीची कामे या आठवड्यात सुरू करण्याच्या तयारीत असताना पावसाने त्यावरही पाणी फेरले आहे.
जोरदार पावसामुळे लाकूडफाटा आणि जनावरांची वैरण भिजली असून, जमीन ओलसर झाल्याने मशागतीची कामे तातडीने करणे शक्य नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे देवळे-चाफवली परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

