(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर उपकेंद्रांतर्गत साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे महत्त्वाचे तांत्रिक काम आज (सोमवार, दि. ३ ऑगस्ट) रोजी हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान पाऊस तसेच काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने संगमेश्वर उपकेंद्राचा वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील ग्राहकांना आज दिवसभर वीजखंडित परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी, वांद्री, संगमेश्वर शहर, कसबा, धामणी आणि डिंगणी या फिडरवरील वीजपुरवठा सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.
साडवली फिडरवर नवीन ब्रेकर बसविण्याचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित फिडरवरील वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
वीजपुरवठा खंडित असल्याने घरगुती ग्राहकांसह व्यापारी आस्थापना आणि लघुउद्योगांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या तांत्रिक पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीज वितरण यंत्रणेतील आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि देखभालीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याबद्दल महावितरणने ग्राहकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

