(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेट नं. १ मधील इयत्ता दुसरीची गुणवंत विद्यार्थिनी कु. आर्या नरेश पवार हिने विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
आर्याने आयटीएस (ITS) परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून, मंथन टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. तसेच बी.डी.एस. परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवत तिने आपल्या शाळेसह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आर्या ही अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती सुवर्णा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी घेतलेली मेहनत आणि आर्याने केलेली सातत्यपूर्ण तयारी यामुळेच हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
आर्याच्या यशामध्ये तिचे वडील श्री. नरेश पवार आणि आई सौ. पल्लवी पवार यांचेही मोठे योगदान आहे. घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांनी आर्याला सतत प्रोत्साहन दिले.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेट नं. १ चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी आर्या, तिचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवाय श्री. मगदूम, धसाडे मॅडम, केंद्रप्रमुख सौ. भाटकर, विस्तार अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी श्री. परिट यांचीही तिला विशेष प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभले.

