( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जयगडहून पालीच्या दिशेने कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चरवेली स्टॉपजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यापासून सुमारे १२ फूट खाली कोसळला. या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी काही काळ थरारक परिस्थिती निर्माण झाली. हा अपघात बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त ट्रकचा चालक विजय मल्लिकार्जुन असून, तो कुकनूर, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक –५८५३२५ येथील रहिवासी आहे.
जयगड येथून कोळसा भरून ट्रक पालीच्या दिशेने जात होता. चरवेली स्टॉपजवळील उतारावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे १२ फूट खाली कोसळला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. चालक विजय हा केबिनमध्ये अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत होता.
दरम्यान, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील चालकाला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
काही मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या महामार्ग पोलिसांचा पत्ता नाही?
कोळशाचे भरलेला हा ट्रक तब्बल रस्त्यापासून बाहेर १२ फूट खाली कोसळला, चालक केबिनमध्ये अडकून पडला आणि त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून धाव घ्यावी लागली. घटनास्थळापासून काही मिनिटांच्या अंतरावर हातखंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. मात्र, अपघाताच्या वेळी तेथील एकही पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघातासारख्या गंभीर प्रसंगी पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. जखमी व्यक्तीला तातडीने मदत मिळणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि बचावकार्याला आवश्यक सहकार्य मिळणे, ही महामार्ग पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. असे असताना मदत केंद्र अगदी जवळ असूनही पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसतील, तर महामार्ग पोलिस मदत केंद्र नेमके कोणासाठी आणि कोणत्या वेळी कार्यरत असते?, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.


