(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीत आज (सोमवार, ३० मार्च) रोजी आयोजित महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या मेळाव्याला लाभला.
मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्वेता खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व महिला सदस्यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले, ज्यांना महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य राजू साळवी आणि पंचायत समिती सदस्या पूर्वा दुर्गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच स्मिता दुर्गवळी, सदस्य अमित पाटील, नितीन दुर्गवळी, शुभदा मुळये, शिल्पा पवार, तसेच सौ. डांगे, सौ. गोणबरे, सौ. लिंगायत आदींसह ग्रामविकास अधिकारी श्री. प्रक्षाळे, माजी सरपंच दीपक दुर्गवळी, सामाजिक कार्यकर्ते संजय दुर्गवळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक डॉ. परशुराम निवेंडकर, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने राजू साळवी आणि पूर्वा दुर्गवळी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राजू साळवी यांनी महिलांच्या विश्वासाबद्दल आभार मानत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. पूर्वा दुर्गवळी यांनीही विकासकामांसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्यात महिलांना डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी येथील समीक्षा सनगरे यांनी प्रात्यक्षिकांसह डिजिटल बँकिंगची माहिती दिली. तसेच डॉ. परशुराम निवेंडकर यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी मोफत नेत्रतपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मेळाव्याला उत्सवी रंग चढला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य शुभदा मुळये यांनी प्रभावीपणे केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

