( मंडणगड )
तालुक्यातील मौजे दहागाव-निमदेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागून गोठा जळून खाक झाला. या दुर्घटनेत दोन दुभत्या गाईंचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून, गोठ्यासह पशुधनाचे मिळून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल विभागाच्या पंचनाम्यात करण्यात आली आहे.
महेंद्र रामचंद्र चव्हाण आणि नीलेश रामचंद्र देवरुखकर यांच्या गुरांच्या गोठ्याला ही आग लागली. गोठ्यात दोन गाई आणि दोन वासरे बांधलेली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे दोन वासरे आणि एका गाईला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन दुभत्या गाईंना वाचविता आले नाही. आगीत गोठ्यालगत असलेली लाकडाची खोपीही जळून नुकसान झाले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच मंडणगडचे महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, ग्राम महसूल अधिकारी उद्धव घाटूश, सरपंच मंगेश दळवी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच बहुसंख्य ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
पंचनाम्यानुसार गोठ्याच्या नुकसानीचा अंदाजे ८० हजार रुपये, तर दोन गाईंच्या मृत्यूमुळे अंदाजे ८० हजार रुपये, असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


