(रत्नागिरी)
जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री आणि तस्करीप्रकरणी वारंवार गुंतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींवर आता कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अशा सराईत गुन्हेगारांविरोधात ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या तडीपारीचे प्रस्तावही तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
अंमली पदार्थ विक्रीच्या साखळीचा बीमोड करण्यासाठी रत्नागिरी पोलिस सातत्याने पावले उचलत आहेत. केवळ तात्पुरती कारवाई नव्हे, तर अशा गुन्हेगारांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या प्रकारातील आरोपींना कोणतीही माफक वागणूक मिळणार नाही, असा स्पष्ट इशाराही बगाटे यांनी दिला.
तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याने अनेक कुटुंबांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पोलिस दलाने व्यापक पातळीवर विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुरवठा करणारे नेटवर्क, स्थानिक वितरक, तसेच आर्थिक व्यवहारांची साखळी शोधण्यासाठी सखोल तपास सुरु असून, प्रत्येक पातळीवर कार्यवाही केली जात आहे. हा लढा केवळ पोलिसांचा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. नागरिकांनी पुढे येऊन ‘ड्रग्जला नाही’ असा स्पष्ट संदेश दिल्यासच अमली पदार्थविरोधी ही लढाई यशस्वी ठरू शकेल, असे आवाहनही बगाटे यांनी यावेळी केले.