(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे घरकुल बांधकामाच्या जागेवरून सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेला किरकोळ वाद उफाळून आल्याने मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात एका भावाने दुसऱ्यावर बांबूच्या काठीने हल्ला केल्याची नोंद असून मंडणगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक पांडूरंग गमरे (वय ४८, रा. कोन्हवली, ता. मंडणगड) यांना ग्रामपंचायत देव्हारेमार्फत घरकुल मंजूर झाले असून संबंधित जागेवर नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी (दिनांक २१/०३/२०२६ ) रात्री साडेदहाच्या सुमारास बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या जोत्यावर त्यांचे सख्खे भाऊ निखील पांडुरंग गमरे हे दारू पित बसले होते. यावेळी “येथे दारू पिऊ नको, नवीन घराचे बांधकाम करायचे आहे,” असे सांगितल्यावर आरोपीने जागेबाबत आक्षेप घेत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. “ही जागा कोणाची आहे मला माहिती नाही, मी येथेच दारू पिणार, तुला जे करायचे ते करून घे,” असे म्हणत आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यानंतर फिर्यादी हे त्यांचे मित्र प्रकाश गजानन तांबे यांच्या घरी गेले असता आरोपी तेथेही पोहोचला. त्याने फिर्यादी यांना खाली ढकलून हातातील बांबूच्या काठीने डाव्या हातावर व पायावर मारहाण केली तसेच पुन्हा शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत दिपक गमरे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

