(मंडणगड)
तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथे एका गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० मे रोजी घडली. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू घडल्याची संतप्त भावना सध्या तालुक्यात उमटत असून, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सविस्तर माहितीनुसार, विधी संदेश सावणेकर (३२) ही गरोदर महिला सात ते आठ महिन्यांची असून अचानक प्रकृती खालावल्याने तिला देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला मंडणगड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
या दरम्यान, गंभीर रुग्ण असतानाही रुग्णवाहिकेची अनुपलब्धता ही अत्यंत धक्कादायक बाब ठरली. १०८ व १०२ क्रमांकावरील शासकीय रुग्णवाहिका तांत्रिक कारणांनी अनुपलब्ध होत्या. यामुळे कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिकेचा वापर करत दापोलीकडे हलवण्यात आले. मात्र उपचाराआधीच रस्त्यात महिलेचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, चालक अथवा डिझेलचा अभाव, ऑक्सिजनची अनुपलब्धता अशा कारणांमुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या गर्भवती महिलांसाठी असलेल्या योजना आणि त्याची अंमलबजावणी तालुक्यात का होत नाही, यावर आता सवाल उपस्थित होत आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता, माहिती घेतल्यावर याबाबत तपशील देतो असे उत्तर देण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हाके यांचा फोन सतत बंद येत असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मृत महिलेच्या कुटुंबीयांसह तालुक्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.