(मंडणगड)
मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील हनुमानवाडीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा अवघ्या २४ तासांत लावून मंडणगड पोलिसांनी आपली दक्षता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रकरणात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि परिणामकारक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धुत्रोली येथील सरस्वती सुखदरे (वय ७४) यांच्या घरात १५ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४ तोळे सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे ३ लाख ३३ हजार रुपये, तसेच एक हजार रुपये रोख अशी मालमत्ता चोरून नेली होती. या प्रकरणी सरस्वती सुखदरे यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तातडीने सक्रिय झाले. घटनास्थळाची कसून पाहणी करून श्वानपथक व बोटांचे ठसे तज्ज्ञ यांच्या मदतीने पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. गुप्त माहिती गोळा करत संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. याच दरम्यान विनोद सुगदरे (वय ४०, रा. धुत्रोली) या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
१७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास, पोलिसांना आपल्या मागावर असल्याचा संशय आल्याने आरोपीने चोरीचा मुद्देमाल घराबाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र मंडणगड पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला धुत्रोली येथील राहत्या घरातून रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईत तपास अंमलदार दत्ताराम बाणे, पोलीस नाईक संजय बारगुडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संबंधदास मावची, पोलीस हवालदार विशाल कोळथरकर, गुप्तवार्ता विभागाचे विनय पाटील तसेच पोलीस पाटील राकेश पोतदार, नूरहसन कडवेकर आणि रमेश जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.
मंडणगड पोलिस ठाण्याच्या पथकाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल तालुक्यातून पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी एस. सणस यांनी मंडणगड पोलीस ठाण्यास भेट देऊन संपूर्ण तपासाची माहिती घेतली आणि पथकाच्या कार्याची प्रशंसा केली. ही घटना मंडणगड पोलिसांच्या दक्षतेचा आणि गुन्हेगारांविरोधातील तातडीच्या प्रतिसादाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे.

