(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी सावंत देसाई हिने एकपात्री अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीत तन्वीने प्रभावी अभिनय सादर करत हे उल्लेखनीय यश मिळवले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या थिएटर विभागाला तब्बल ८ वर्षांनंतर एकपात्री अभिनय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. तन्वीच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे.
तन्वीला प्रा. आर्या वंडकर, प्रा. ओंकार रसाळ आणि डॉ. आनंद आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले. ‘सखाराम बाईंडर’, ‘चारचौघी’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकांतील महत्त्वाच्या पात्रांच्या भूमिका साकारून तिने अभिनयाचा अनुभव घेतला असून, विविध ऑडिशन्सच्या माध्यमातूनही ती सातत्याने आपल्या अभिनयकौशल्याला आकार देत आहे.
तन्वीने सादर केलेल्या एकपात्रीत सध्याच्या मनोरंजन क्षेत्रातील एका महत्त्वाच्या प्रवृत्तीवर भाष्य करण्यात आले आहे. इंडस्ट्रीमध्ये केवळ फॉलोअर्सच्या संख्येच्या आधारे कलाकारांची निवड करण्याच्या प्रकारावर हे पात्र भाष्य करते. अभिनय हा केवळ प्रसिद्धी किंवा फॉलोअर्स मिळवण्याचा मार्ग नसून तोच आपले जगणे आहे, अशी भूमिका या एकपात्रीतून मांडण्यात आली आहे. डिजिटल युगामुळे कलाकार आणि रसिक यांच्यातील बदललेले नातेही या सादरीकरणातून अधोरेखित केले आहे. जुन्या रंगकर्मींच्या परंपरेची आठवण करून देताना, फॉलोअर्सपेक्षा खरा रसिक आणि त्याच्या डोळ्यांत उमटणारी भावना अधिक महत्त्वाची असल्याचे पात्र सांगते.
शेवटी स्वतःचा स्वाभिमान जपत ऑडिशन्स देत राहण्याचा निर्धार या पात्राकडून व्यक्त केला जातो. पडदा पडल्यानंतर एखाद्या प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आले, चेहऱ्यावर हसू उमटले किंवा त्याला स्वतःचे आयुष्य त्या अभिनयात दिसले, तरच आपल्या अभिनयाचे खरे सार्थक झाले, असा भावपूर्ण संदेश या एकपात्रीतून देण्यात आला आहे.
तन्वी सावंत देसाई हिच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


